Sunday, November 6, 2011

~:_चार दिवस आयुष्याचे_:~



चार दिवस हसायचे, चार दिवस रडायचे
आयुष्याचे असतात फक्त चार दिवस जगायचे...

तुम्ही म्हणाल "कित्येक वर्ष जगले मोठे मोठे,
तू म्हणतोस ते चार दिवस असतात तरी कोठे?"...

चार दिवस आयुष्याचे तुम्ही गेलात का विसरून!
असे विचारताच बसू नका मात्र पंचांग पसरून...

चार दिवस कुठले ते मी सांगतो समजावून,
आता विचार करू नका तुम्ही डोके खाजवून...

तांबडे फुटते तेव्हा, जेव्हा जन्म आपला होतो
तेव्हापासून आपला पहिला दिवस सुरू होतो...

पहिला दिवस गुरुवार म्हणू, कारण नंतर सांगतो.
पहिल्या दिवशी आपण फक्त वाकडे तिकडे रांगतो...

या दिवशी सकाळी आपण नुसते रडतो.
पडत पडत खेळतो आणि खेळता खेळता पडतो...

हळु हळु दुपार होते तुटक चालू लागतो,
कोवळ्या बॉबड्या मुखातून बोबडे बोलू लागतो...

संध्याकाळ झाली की शाळेत जाऊ लागतो,
नंतर मात्र सिनेमाची गाणी गाऊ लागतो...

शालेय जीवन संपते तेव्हा रात्र येते धाऊन,
आपण सगळे निवांत पडतो निद्राधीन होउन...

शुक्रवार उजाडतो तेव्हा कॉलेज मध्ये असतो,
कुणी अभ्यास करतो तर कुणी वर्गातही नसतो...

तारुण्याची स्फूर्ति तेव्हा अंगामध्ये येते
गाड्यांवर नि घोड़यांवर वेगाने ती नेते...

शुक्रवारी भर दुपारी करियर घडवू लागतो
पोरकटपणा जाउन आपण प्रौढासारखे वागतो...

संध्याकाळी यशासाठी प्रयत्न होतात खूप
इथे मात्र भयंकर असते प्रयत्नांचे रूप...

ह्या वाराची रात्र होतांना यशापयश ठरतं
कुणी इथे जिंकतं तर कुणी दुर्दैवाने हरतं...

हरणारे पुन्हा प्रयत्न करतात तर जिंकणारे मिठाई खातात
असे करता करता शेवटी सगळे झोपी जातात...

शनिवार उजाडतो तेव्हा सगळे संसार थाटतात
आप्त-स्वकीयांसोबत सुख दु:ख वाटतात...


संसार सुरु झाल्यावर नसते माझे तुझे
तेव्हा फ़क्त वाहायचे असते कुटुम्बाचे ओझे...

पेंशनर होउन आपण खुशाल राहतो
आठवणीचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतो...

हळु हळु चेह-यावरती सुरकुती उमटू लागते
आयुष्याची नाव आता सुट्टीचा किनारा मागते...

अश्या इच्छा अश्या मागण्या असतात फिरत हवेत
अश्यातच निद्रादेवी हळुच घेते कवेत...

रविवारी सकाळी यमाजी येतात
आपलं पाप-पुण्याचं प्रवासाच सामान स्वत:च हाती घेतात...

आपण शेवटी माणूस, म्हणून इच्छा वाढत जातात
"थोडा वेळ दयाल का अजून?" शब्द ओठांवर येतात...

प्रवास आपला होत असतो काळ वेळ कापत
नवे युग जाणून देव देतो थोड़ा वेळ मोफत...

तेवढ्या वेळात घ्यायचा असतो आपल्याला जगाचा निरोप
त्यावेळी विसरावे लागतात सगळ्या चूका आणि आरोप...

येउन ठेपते उम्बरठ्याशी एकदाची ती कातरवेळ
कारण संपत आला असतो चार दिवसांचा आपला खेळ...

यमाजी आता आपल्याला घट्ट मिठीत घेतात
'सुट्टी' म्हणून ते आपल्याला सोबत घेउन जातात...

सुटिचाच दिवस हवा होता चौथा
रविवारशिवाय दुसरा दिवस ही नव्हता...

आता समजलं का तुम्हाला गुरूवार का घेतला पहिला,
कारण निश्चित सुट्टीचा एक दिवस रविवारच राहिला...