Monday, September 23, 2013

घरच्याच मैफ़िलीत सादर केलेली माझी एक गझ़ल...

https://www.youtube.com/watch?v=AQzgJJqfH8k&feature=youtube_gdata_player

मराठी गझल...

जळालो शब्द माझा पाळताना,
तुझे-माझे पुरावे जळताना...

फुलांचा वाटला हेवा मलाही
तुझ्या केसांत गजरा माळताना...

निजा वाळूत ओलावा असेतो
उडाया लागते ती वाळताना...

स्वतःला भेटल्याचा भास झाला
तिला हळुवार मी कवटाळताना...

खुणा सांभाळल्या वेड्यापरी मी,
मुका झालो मुके सांभाळताना...

...आनंद रघुनाथ

Sunday, September 8, 2013

काही सुटे शेर...

जेवढा पळशील मागे तेवढी टाळेल ती ही
होउदे काही असे की शायरीला ”तू” सुचावे...
------------------------------------
गाण्यात चूक झाली अन् नेमके उमगले
की दर्द केवढा हा वर्ज्य स्वरात आहे...

माधुर्य चाखतांना सपशेल ”ते” विसरले
कित्येक मक्षिकांची पूंजी मधात आहे...

मरणास काय भ्यावे... त्याचे न भय मला... पण...
मी काळजीत आहे, ती काळजात आहे...
------------------------------------
राखुनी अंतर जरा बसलो, नको समजू दुरावा
सभ्यता, संयम, नितळतेचाच हा आहे पुरावा...
------------------------------------
कधी होणार माझी तू? मला हे सांग ना गजले
तुझ्या-माझ्या मध्ये येथे उभी नियमावली आहे...
------------------------------------
तू दिला होकार आणिक हात ही हातात माझ्या
पाहिले हे मध्यरात्री मी खुळ्या स्वप्नात माझ्या...

मी कशी अंगावरी मिरवू तशी पिवळी चकाकी,
भूकवेड्या आसवांची चमक ह्या डोळ्यांत माझ्या...
------------------------------------
चार भिंती आतुनी सजवून तू
पाैर्णिमेचे चांदणे विझवू नको...
------------------------------------
अक्षरांचा केवढा आघात आहे!
लेखणीची आयुधांवर मात आहे...
------------------------------------
शायराला आज आशिर्वाद द्या
अन् उद्या या शायरीला दाद द्या...

वेचतो अन् मग फुलांना गुंफतो,
शब्दसुमनांचा जरा संवाद द्या...
------------------------------------
कोण आले, कोण गेले खंत नाही
मरण म्हणजे जीवनाचा अंत नाही...
------------------------------------
तशीच चटपटीत अन् जहाल भेळ दे जरा,
हसायचे, रुसायचे जुनेच खेळ दे जरा...

विचारले मनास मी, ”मनात काय रे तुझ्या?”
चिडून ते हि बोलले, ”मला हि वेळ दे जरा...”
------------------------------------