Monday, September 23, 2013

घरच्याच मैफ़िलीत सादर केलेली माझी एक गझ़ल...

https://www.youtube.com/watch?v=AQzgJJqfH8k&feature=youtube_gdata_player

मराठी गझल...

जळालो शब्द माझा पाळताना,
तुझे-माझे पुरावे जळताना...

फुलांचा वाटला हेवा मलाही
तुझ्या केसांत गजरा माळताना...

निजा वाळूत ओलावा असेतो
उडाया लागते ती वाळताना...

स्वतःला भेटल्याचा भास झाला
तिला हळुवार मी कवटाळताना...

खुणा सांभाळल्या वेड्यापरी मी,
मुका झालो मुके सांभाळताना...

...आनंद रघुनाथ

Sunday, September 8, 2013

काही सुटे शेर...

जेवढा पळशील मागे तेवढी टाळेल ती ही
होउदे काही असे की शायरीला ”तू” सुचावे...
------------------------------------
गाण्यात चूक झाली अन् नेमके उमगले
की दर्द केवढा हा वर्ज्य स्वरात आहे...

माधुर्य चाखतांना सपशेल ”ते” विसरले
कित्येक मक्षिकांची पूंजी मधात आहे...

मरणास काय भ्यावे... त्याचे न भय मला... पण...
मी काळजीत आहे, ती काळजात आहे...
------------------------------------
राखुनी अंतर जरा बसलो, नको समजू दुरावा
सभ्यता, संयम, नितळतेचाच हा आहे पुरावा...
------------------------------------
कधी होणार माझी तू? मला हे सांग ना गजले
तुझ्या-माझ्या मध्ये येथे उभी नियमावली आहे...
------------------------------------
तू दिला होकार आणिक हात ही हातात माझ्या
पाहिले हे मध्यरात्री मी खुळ्या स्वप्नात माझ्या...

मी कशी अंगावरी मिरवू तशी पिवळी चकाकी,
भूकवेड्या आसवांची चमक ह्या डोळ्यांत माझ्या...
------------------------------------
चार भिंती आतुनी सजवून तू
पाैर्णिमेचे चांदणे विझवू नको...
------------------------------------
अक्षरांचा केवढा आघात आहे!
लेखणीची आयुधांवर मात आहे...
------------------------------------
शायराला आज आशिर्वाद द्या
अन् उद्या या शायरीला दाद द्या...

वेचतो अन् मग फुलांना गुंफतो,
शब्दसुमनांचा जरा संवाद द्या...
------------------------------------
कोण आले, कोण गेले खंत नाही
मरण म्हणजे जीवनाचा अंत नाही...
------------------------------------
तशीच चटपटीत अन् जहाल भेळ दे जरा,
हसायचे, रुसायचे जुनेच खेळ दे जरा...

विचारले मनास मी, ”मनात काय रे तुझ्या?”
चिडून ते हि बोलले, ”मला हि वेळ दे जरा...”
------------------------------------

Wednesday, December 26, 2012

जाउ दे...


~*_जाउ दे_*~


संपला विश्वास आता जाउ दे,
फक्त उरले श्वास आता जाउ दे...

शिंपल्यांतून मोतीयांचा हा सडा,
काय ही आरास आता जाउ दे...

संग जितका दु:ख तितके वाढते,
जायचे हमखास आता जाउ दे...

इतर ही येतील काळिज घेऊनी,
मी न कोणी खास आता जाउ दे...

वाट माझी अडविती अश्रू तुझे,
फक्त थोडे हास आता जाउ दे...

झिंगण्याचे सोग मी आणू कसे?
विनवितो मद्द्यास "आता जाउ दे..."

हे मिळाले, ते हवे, तेही हवे,
हा कसा हव्यास आता जाउ दे...

ओढ ही वाढे दुरावा ठेऊनी,
मज नको सहवास आता जाउ दे...

नाव माझे घेतले "आनंद" तू,
सोसला पण त्रास आता जाउ दे...


                     ...आनंद रघुनाथ

Saturday, December 22, 2012

जीकर जाएंगे___

-एक हिन्दी गज़ल-

सोचके आए थे कुछ कर जाएंगे,
क्या पता था जीतसे डर जाएंगे___

रोते क्यों हो एक अशर्फी के लिए?
कुछ नहीं जो साथ लेकर जाएंगे___

चोचले खानेके अपने है नहीं,
हम तो वरना भूखसे मर जाएंगे___

आज उसने नैन खोले ही नहीं,
हमने तो सोचा था पीकर जाएंगे___

हाँ! मुहब्बत हमने की, ये सोचके,
आए दुनियामे तो जीकर जाएंगे___

आसुओंको पोछने आएंगे वो,
उनमे अपने पाप धोकर जाएंगे___

जख्म होजाए मगर ना दर्द हो,
इस कदर वो हमको छूकर जाएंगे___

बेवफाको कैसे हम दे बद्दुआ!
चूमके वो होठ सीकर जाएंगे___

दर्द क्यों सबको दिया  'आनंद'ने ?
जो है पाया वोही देकर जाएंगे___


                                  ...आनंद रघुनाथ

Sunday, November 6, 2011

~:_चार दिवस आयुष्याचे_:~



चार दिवस हसायचे, चार दिवस रडायचे
आयुष्याचे असतात फक्त चार दिवस जगायचे...

तुम्ही म्हणाल "कित्येक वर्ष जगले मोठे मोठे,
तू म्हणतोस ते चार दिवस असतात तरी कोठे?"...

चार दिवस आयुष्याचे तुम्ही गेलात का विसरून!
असे विचारताच बसू नका मात्र पंचांग पसरून...

चार दिवस कुठले ते मी सांगतो समजावून,
आता विचार करू नका तुम्ही डोके खाजवून...

तांबडे फुटते तेव्हा, जेव्हा जन्म आपला होतो
तेव्हापासून आपला पहिला दिवस सुरू होतो...

पहिला दिवस गुरुवार म्हणू, कारण नंतर सांगतो.
पहिल्या दिवशी आपण फक्त वाकडे तिकडे रांगतो...

या दिवशी सकाळी आपण नुसते रडतो.
पडत पडत खेळतो आणि खेळता खेळता पडतो...

हळु हळु दुपार होते तुटक चालू लागतो,
कोवळ्या बॉबड्या मुखातून बोबडे बोलू लागतो...

संध्याकाळ झाली की शाळेत जाऊ लागतो,
नंतर मात्र सिनेमाची गाणी गाऊ लागतो...

शालेय जीवन संपते तेव्हा रात्र येते धाऊन,
आपण सगळे निवांत पडतो निद्राधीन होउन...

शुक्रवार उजाडतो तेव्हा कॉलेज मध्ये असतो,
कुणी अभ्यास करतो तर कुणी वर्गातही नसतो...

तारुण्याची स्फूर्ति तेव्हा अंगामध्ये येते
गाड्यांवर नि घोड़यांवर वेगाने ती नेते...

शुक्रवारी भर दुपारी करियर घडवू लागतो
पोरकटपणा जाउन आपण प्रौढासारखे वागतो...

संध्याकाळी यशासाठी प्रयत्न होतात खूप
इथे मात्र भयंकर असते प्रयत्नांचे रूप...

ह्या वाराची रात्र होतांना यशापयश ठरतं
कुणी इथे जिंकतं तर कुणी दुर्दैवाने हरतं...

हरणारे पुन्हा प्रयत्न करतात तर जिंकणारे मिठाई खातात
असे करता करता शेवटी सगळे झोपी जातात...

शनिवार उजाडतो तेव्हा सगळे संसार थाटतात
आप्त-स्वकीयांसोबत सुख दु:ख वाटतात...


संसार सुरु झाल्यावर नसते माझे तुझे
तेव्हा फ़क्त वाहायचे असते कुटुम्बाचे ओझे...

पेंशनर होउन आपण खुशाल राहतो
आठवणीचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतो...

हळु हळु चेह-यावरती सुरकुती उमटू लागते
आयुष्याची नाव आता सुट्टीचा किनारा मागते...

अश्या इच्छा अश्या मागण्या असतात फिरत हवेत
अश्यातच निद्रादेवी हळुच घेते कवेत...

रविवारी सकाळी यमाजी येतात
आपलं पाप-पुण्याचं प्रवासाच सामान स्वत:च हाती घेतात...

आपण शेवटी माणूस, म्हणून इच्छा वाढत जातात
"थोडा वेळ दयाल का अजून?" शब्द ओठांवर येतात...

प्रवास आपला होत असतो काळ वेळ कापत
नवे युग जाणून देव देतो थोड़ा वेळ मोफत...

तेवढ्या वेळात घ्यायचा असतो आपल्याला जगाचा निरोप
त्यावेळी विसरावे लागतात सगळ्या चूका आणि आरोप...

येउन ठेपते उम्बरठ्याशी एकदाची ती कातरवेळ
कारण संपत आला असतो चार दिवसांचा आपला खेळ...

यमाजी आता आपल्याला घट्ट मिठीत घेतात
'सुट्टी' म्हणून ते आपल्याला सोबत घेउन जातात...

सुटिचाच दिवस हवा होता चौथा
रविवारशिवाय दुसरा दिवस ही नव्हता...

आता समजलं का तुम्हाला गुरूवार का घेतला पहिला,
कारण निश्चित सुट्टीचा एक दिवस रविवारच राहिला...

Wednesday, October 19, 2011

रुसवा

-:रुसली कविता:-

धकाधकीच्या आयुष्याने पुसली आहे माझी कविता,
क़ाही केल्या हासत नाही, रुसली आहे माझी कविता...

(सद्ध्या अपूर्ण ...)