Tuesday, May 3, 2011

कविता

_:कविता:_ ("कविता म्हणजे नेमकं काय?"या प्रश्नाचे माझ्या मनाने दिलेले उत्तर...)

खास लिहिण्यालाच कविता आज मी ठरवून बसलो
आरश्या पुढतीच बसुनी मी मला पाहून हसलो
दिवस गेला, रात्र गेली प्रसवली नाहीच कविता
न ठरविता कागदावर जी उतरते तीच कविता...

सहज पुसता सांगती ते काव्य स्फुरते चिन्तनाने
बसुन निश्चल एक चित्ती मात्र स्रुष्टी-दर्शनाने
सुमन सुंदर बघुन सुद्धा स्फुरत ही नाहीच कविता
स्फुरत नाही पण फुलातुन जी उमलते तीच कविता...

शब्द जेव्हा सौम्य असतो, भावना ही सौम्य असते
सौम्य शब्दांच्या उन्हाची तीव्रता ही सौम्य असते
सौम्य शब्दांच्या सुरांवर सौम्य ही असतेच कविता
सौम्य असुनी जी मनाला थेट भिडते तीच कविता...

प्रियकराची शब्दगंगा वाहते नि:शब्द हाउन
प्रेयसीला प्रियकराचा पोचते संदेश हाउन
प्रेयसीला प्रियकराची कळत ही नाहिच कविता
प्रेयसीला कळुनही जी कळत नाही तीच कविता...

जन्म कवितेतून होतो, मरण ही कवितेत होते
जन्म-मरणाचि हकीकत कथन ही कवितेत होते
सार सांगुन जीवनाचे सरतही नाहीच कविता
ही हकीकत सरुनही जी सरत नाही तीच कविता...

No comments:

Post a Comment