Monday, May 16, 2011

नशा

_:नशा:_


हृदय माझे जाळण्यासाठी नशेला टाळतो,
खोल जखमा त्या सुगंधी अद्यपी कुरवाळतो...

पाहिली होती कधी मी ही नशा डोळ्यांमध्ये
फक्त स्मरूनी आज तिजला मी मला कवटाळतो....
खोल जखमा...

शुभ्र फेसाळुन झाली ही सुराही अप्सरा,
या सुरेला फक्त बघुनी मी तिच्यावर भाळतो...
खोल जखमा...

धुंद होऊन पाऊले जाती जुन्या वाटेकडे,
हात खेचुन मीच माझा, मी मला साम्भाळतो...
खोल जखमा...

घोट पहिला घेऊनच मग दुग्धप्याला ठेवतो,
पीत नसुनी मद्यापींचे नियम सारे पाळतो...
खोल जखमा...

ऊन्ह-पाऊस खेळती मम जीवनाच्या अंगणी,
मीच देतो स्मीत मजला मीच अश्रू ढाळतो...
खोल जखमा...

शब्द बनले मद्य, जेव्हा कागदावर उतरले,
खूप झाली ही नशा, मी प्रेमपत्रे जाळतो...
खोल जखमा...

नजर ती, की वज्र होते? की तीरांचा पुंजका?
झेलूनी आनंद ह्र्दयी का असा रक्ताळतो...
खोल जखमा...

No comments:

Post a Comment